श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 22 डिसेंबर 2025
कामठी नगरपरिषद निवडणुकीचा काल लागलेल्या निकालावरून शहराच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटवला आहे. या निकालावर कांग्रेस सह बहुजन रिपब्लिकन एकता मंच नेही आक्षेप घेतला आहे. भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल यांचा 103 मतांनी झालेला विजय हा लोकशाहीचा विजय नसून तो बोगस मतदानाचा आणि ईव्हीएम फेरफारीचा विजय असल्याचा घणाघाती आरोप बरिएमं नेत्या माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी थेट पालकमंत्र्यांवर निशाणा साधला असून आता हा लढा हायकोर्टात लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
भाजपचा विजय संशयास्पद, बावनकुळे ईव्हीएम मॅनेजमेंटचे मास्टरमाईंड -माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचा खळबळजनक आरोप, हायकोर्टात धाव घेणार
बरिएमं नेत्या ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात गंभीर आरोप केला की, निवडणुकीच्या दिवशी सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान राबविण्यात प्रशासनाला आणि पोलिसांना याची कल्पना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यावरून हे स्पष्ट होते की, पोलिस आणि निवडणूक प्रशासन पूर्णपणे राजकीय दबावाखाली काम करीत आहे, असेही अँड.कुंभारे म्हणाल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट हल्ला चढवताना अँड. सुलेखाताई कुंभारे म्हणाल्या, गेल्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री 17 हजार मतांनी पिछाडीवर होते. ज्या अजय अग्रवाल यांची संपूर्ण निवडणुकीत साधी चर्चाही नव्हती, त्यांना इतकी मते पडलीच कशी? यावरून हे सिद्ध होते की, चंद्रशेखर बावनकुळे हे ईव्हीएम मशीन मॅनेजमेंटचे मास्टरमाईंड आहेत. दोन बलाढ्य पक्षांशी एकाच वेळी लढा देऊनही आम्ही आमचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले आहे आणि ते या निवडणुकीत सिद्ध झाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, विजयाची ही पद्धत लोकशाहीला घातक असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दाद मागण्यासाठी हायकोर्टात ( उच्च न्यायालयात) याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. आम्ही जनतेच्या दरबारात लढलो, आता न्यायालयात लढू. हा विजय पारदर्शक नाही, तर षड्यंत्राचा भाग आहे, असेही अँड. कुंभारे म्हणाल्या.




































