श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 9 जानेवारी 2026
महादुला नगरपंचायत हद्दीत वाढत असलेल्या बेवारस कुत्रे व प्राणीजन्य समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी प्राणी जन्म नियंत्रण समिती अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते, सर्पमित्र व वन्यजीव रक्षक रजनीकांत गुलाबराव बोपचे यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीची मागणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत महादुला यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या सोबत वर्ल्ड फॉर नेचर सामाजिक संस्था तसेच पशुप्रेमी व सर्पमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन सादर करताना नागपूर जिल्हा अध्यक्ष दद्दू गणवीर यांच्यासह नरेंद्र उके, राहुल यादव, प्रणय वानखेडे, सुनील कच्छावे, ओम सहारे, तारा शाहू, भोजराज रामटेके, प्रवीण पाईकराव, राकेश वासनिक, प्रवीण पारची, रोहित पवार, मारण्या पारवे, पंकज बोपचे, अश्विन राऊत, रोहित गजभिये, चेतन निंबाळकर, दीपक देशभरतार, प्रकाश रामटेके तसेच अनेक पशुप्रेमी, सर्पमित्र व वन्यजीव रक्षक उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रजनीकांत बोपचे हे मागील अनेक वर्षांपासून महादुला कोराडी परिसरात बेवारस व जखमी प्राणी, साप तसेच इतर वन्यजीवांच्या संरक्षण, बचाव व पुनर्वसनाचे कार्य करत आहेत.
मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती, तत्काळ रेस्क्यू व प्रशासनाशी समन्वय साधून ते सामाजिक बांधिलकीतून कार्यरत आहेत.
सध्या नगरपंचायत क्षेत्रात बेवारस कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर शास्त्रीय, कायदेशीर व नियोजनबद्ध उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या प्राणी जन्म नियंत्रण (ABC) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वर्ल्ड फॉर नेचर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा अनुभव लक्षात घेता, प्राणी जन्म नियंत्रण समितीत अशासकीय सदस्य म्हणून संधी मिळाल्यास लसीकरण, निर्बंधन (नसबंदी), जनजागृती, निधी व योजनांसाठी पाठपुरावा तसेच मानव–प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
या मागणीवर नगरपंचायत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
प्रतिक्रिया
” सदस्यत्व मिळाल्यानंतर प्राणी व मानव यांच्यातील संघर्षाच्या प्रसंगी योग्य वेळी योग्य निर्णय, तत्काळ प्रतिसाद, प्रशासनाशी समन्वय आणि कायदेशीर चौकटीत उपाययोजना राबविण्यास शासकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य लाभेल. यामुळे प्राण्यांच्या हितासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक परिणामकारक पद्धतीने काम करता येईल.
शासनासोबत थेट समन्वय साधत काम करण्याची संधी स्थानिक प्राणिमित्रांना मिळेल आणि प्राणी जन्म नियंत्रण, लसीकरण, जनजागृती व इतर महत्त्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आम्ही व्यक्त करतो.”
— दद्दू गणवीर (जिल्हाध्यक्ष) , वर्ल्ड फॉर नेचर सामाजिक संस्था


































