श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर, 19. जानेवारी 2026 :
अमरावती महापालिका निवडणुकीतील पराभवाचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक असून, पराभूत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल. यासाठी अमरावती येथे विशेष चौकशी टीम पाठवण्यात येणार असून, कोणी विरोधात काम केले याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नागपूर येथील जिल्हा नियोजन भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमरावतीतील निवडणूक पराभव, महापौर पदाचा कालावधी, युतीचे राजकारण तसेच विरोधकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली.
अमरावतीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत नेमके काय घडले, कोणी पक्षविरोधी काम केले का, याची चौकशी केली जाईल. पराभूत उमेदवारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्याची दखल घेण्यासाठी विशेष टीम अमरावतीला पाठवली जाणार आहे.
मुंबईतील महापौर पदाचा अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ वाटप करण्याच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेची अशी मागणी असल्यास ती योग्य पटलावर चर्चेसाठी घेतली जाईल. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये यावर सविस्तर चर्चा होईल. भाजप–शिवसेना युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडत त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक ठिकाणी ही युती होत असून, ती निश्चितच चांगली बाब आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बावनकुळे म्हणाले, “त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.”
कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी केलेली मागणी ही जुनीच कॅसेट असल्याची टीका त्यांनी केली. यापूर्वी 200 मतांनी पराभव झाल्यानंतरही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती, आता पुन्हा तीच मागणी पुढे आणली जात असल्याचे बावनकुळे म्हणाले.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, आरोप करणे हेच त्यांचे रोजचे काम झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळाची आणि आमच्या एका वर्षाच्या कामकाजाची तुलना केली तरी वास्तव समोर येईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला































