श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
तरोडी (बु.)-कामठी /नागपुर : 27 जानेवारी 2026.
श्री गजानन शिक्षण सेवा संस्था यांच्या वतीने दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी प्रिआंती इंग्लिश स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज, तरोडी (बु.), ता. कामठी, जि. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा 2026 अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या महिला मेळाव्यास ग्रामीण भागातून हजारो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मेळाव्याचे उद्घाटन प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे, रश्मीताई बर्वे,प्रा. हर्षा बुराडे, शांता कुंभरे यांच्या शुभहस्ते पार पडले. घर, कुटुंब आणि समाजासाठी अविरत झटणाऱ्या महिलांना त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून काही क्षण विश्रांती मिळावी, त्यांचा आत्मविश्वास, आनंद आणि सर्जनशीलता फुलावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याने महिलांसाठी हक्काचा आनंदाचा मंच उपलब्ध करून दिला. विविध मनोरंजनात्मक व मैदानी स्पर्धांमधून महिलांचा उत्साह, सहभाग आणि हास्याचा जल्लोष संपूर्ण परिसरात अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विदर्भातील प्रसिद्ध रिल स्टार नेहा ठोंबरे यांची उपस्थिती लाभली. तसेच सौ. रश्मी बर्वे (माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद नागपूर), सौ. हर्षाताई बुराडे (प्राचार्या, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नागपूर) आणि सौ. शांता कुमरे (माजी सदस्य, जिल्हा परिषद नागपूर) ऍड. रश्मी तलमले, प्रा. स्नेहा राऊत, नीलम सिंग, माजी सभापती दिशा चनकापुरे, माजी पंचायत समिती सदस्य सोनू कुथे, प्रा. नंदा ठाकरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या एकत्रिकरणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांच्या सामाजिक महत्त्वाचे कौतुक केले.
सलग 12व्या वर्षी यशस्वीपणे आयोजित करण्यात आलेला हा महिला मेळावा संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण आदर्श ठरला. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे (माजी सभापती महिला व बालकल्याण, जि. प. नागपूर) यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम महिलांच्या आनंद, आत्मसन्मान आणि सक्षमीकरणाचा प्रभावी मंच बनला आहे. भविष्यातही महिलांसाठी असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

स्पर्धेत जिंकलेल्या स्पर्धेकांना पैठणी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. स्पर्धेमध्ये नृत्य, फेन्सी ड्रेस वन मिनिट शो, रसिखेच, फुगडी, धावणी, दोरीवरच्या उड्या ई. स्पर्धा घेण्यात आल्या. मंच व भव्य दोन मैदान असे एकाचवेळी तीन मैदानावर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. तिन्ही मैदान मिळून 4000 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता
तसेच प्रतिकुल परिस्थितीतही कर्तृत्व गाठणाऱ्या प्रा. हर्षा बुराडे व शांता कुमरे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच प्रा.अवंतिका लेकुरवाले यांच्या वतीने आयोजित प्रशिक्षण क्लास मध्ये प्रशिक्षण घेवून उद्योग सुरु करणाऱ्या 43 महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला बचत गटासाठी साहित्य विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशासाठी प्रा. नंदा ठाकरे यांनी व त्यांच्या चमुने विशेष परिश्रम घेतले.

































