श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
महादुला नगरपंचायत /नागपुर : 20 डिसेंबर 2025.
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत निवडणुक ही राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिष्ठेची लढाई समजली जाते. मागील 2014 पासुन भाजप ची सत्ता असलेल्या महादुला नगरपंचायत मध्ये भाजपाला पुन्हा हैट्रिक मारण्यात जनता साथ देते की याठिकाणी सत्तापरिवर्तन येथील जनता करते? उद्या 21 डिसेंबर 2025 रोजी नागपूर जिल्ह्यातील विविध नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचे निकाल असुन महादुला नगरपंचायत निवडणुकीत नेमका गुलाल कोण उधळणार याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
मोठ्या प्रमाणात मतदारांत पैशांचे वाटप हा चिंतेचा विषय?
एकीकडे निवडणुक आयोगाने आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याचे सांगितले.. तर निवडणुक आयोगाची टीम पोलीस यंत्रणा कुठेही सक्रीय दिसली नाही. प्रत्येक मतदाराला 3 हजार ते 5 हजार वाटल्याची चर्चा ऐकण्यात होती. महादुला नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाल्याचे दिसून येत होते. यावेळी पैशांचे वाटपाविरोधात कोणीही सक्रीय दिसले नाही. निवडणुकीत अशा पद्धतीने पैशांचे वाटप हा चिंतेचा विषय असुन यावर तत्कालीन निवडणुक आयोगाचे अध्यक्ष टी. एन. शेषन सारखे कडक अधिकारी व काटेकोर अंमलबजावणी करणारे नवीन निवडणुक आयुक्त नसल्याने निवडणुकीत असे प्रकार वाढलेत. निवडणुक म्हटल्यावर मतदारांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याने मतदारांच्या अपेक्षा करतांना हे सगळे प्रकार प्रत्येक प्रभागात काही राजकीय पक्षाकडुन दिसले.
महादुला नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच भाजप चे ठेकेदार मनोज सावजी यांच्या पत्नी हेमलता सावजी यांना नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवले होते. तर कांग्रेसचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या पत्नी सुषमा रंगारी ह्या मैदानात होत्या.
तर दुसरीकडे कांग्रेसच्या माजी नगरसेविका अर्चना मंडपे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या.तर बसपा कडुन साधना काटकर उभ्या होत्या. मागील 10 वर्षापासुन 150 कोटी रुपये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादुला नगरपंचायत साठी दिले. परंतु 150 कोटी रुपयांचे टेंडर भाजप च्या ठेकेदारांना आपापसात वाटुन विकासाची कामे करण्याचे चित्र उभे केले. वास्तविक महादुला येथे विकास झालाच नसल्याचा व फक्त ठेकेदारांचाच विकास झाल्याचा विरोधक सातत्याने आरोप करीत राहिले. परंतु विरोधकांच्या कोणत्याही आरोपाला न जुमानता भाजप नेत्यांची भिस्त ठेकेदारांवरच दिसली. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाजेनको कोराडी येथील बचतगटाच्या महिला /शासकीय कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचा विरोधकांकडून आरोप होत राहिला. पण सत्तेसाठी व आपला गड टिकविण्यासाठी भाजप नेत्यांनी सर्व हथकंडे वापरले. महादुला शहरात खेळाचे मैदान, गार्डन,समाजमंदिर (मंगल कार्यालय) ग्रीन जीम, सुसज्ज मार्केट नसल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. परंतु ही नाराजी EVM मशिन मधुन बाहेर पडेल का? जनता नेमकी कुणाच्या मागे राहिली? हे तर उद्याच निकालानंतर स्पष्ट होईल. तर दुसरीकडे विद्यमान भाजप नगरसेवकांची तिकिट कापुन नव्या चेहऱ्यांना भाजप ने संधी दिल्याने जुन्या भाजप नेत्यांनी भाजप चे कितपत इमानदारीने काम केले हे ही उद्या स्पष्ट होइल.
काही भाजप च्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतलेला ही ह्या निवडणुकीत दिसला. तर दुसरीकडे चर्चा अशी होती की भाजपची असंतुष्ट मते कांग्रेस ला जाऊ नये म्हणून मतविभागणी साठी भाजप च्या असंतुष्टांना सर्व रसद पडद्यामागुन भाजप नेत्यांनी पुरवली असेही बोलले जात आहे.
शिवसेना शिंदे पक्षाकडून भाजप च्या माजी नगरसेविका सरस्वती लांडगे, भाजपा चे सचिन वानखेडे,सुरेंद्र सोमकुंवर, आकांक्षा राहुल बागडे,राजु सेवतकर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. इथे शिवसेना शिंदे पक्षाच्या ताराबाई रहांगडाले यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांची नगराध्यक्ष पदासाठी मते नेमकी भाजप च्या हेमलता सावजी कडे जातात कि कांग्रेसच्या सुषमा रंगारी यांच्या कडे जातात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना मंडपे ह्या किती प्रमाणात मतविभाजन करतात? यांवर नगराध्यक्ष पदाचे गणित अवलंबून आहे. पण अर्चना मंडपे तेवढ्या चालल्या नाही.. तर यावेळी महादुला शहरात कांग्रेस उमेदवारांसाठी जनता सत्तापरिवर्तनाच्या वाटेवर असल्याचा व कांग्रेस ची सत्ता आणण्यासाठी तयार असल्याचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी यावेळी सांगितले. कांग्रेस उमेदवारांसाठी कांग्रेस नेता माजी मंत्री सुनील केदार, खासदार शामकुमार बर्वे यांनी एकच सभा घेतली. सुरेश भोयर हे सुद्धा महादुला येथे प्रचारासाठी आले होते. कांग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांना याठिकाणी जास्त सहभागी केले नाही. सर्व निवडणुक माजी सभापती सचिन मानवटकर व माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी स्वबळावर लढवली.कांग्रेसचे माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांची समाजात मनमिळाऊ, सर्वांना अडचणित मदत करणारे व सर्वांशी म्रृदु भाषेत बोलणारे समाजसेवी नेत्रृत्व म्हणून परिसरात ओळख आहे. त्यांच्या या कार्याची पावती त्यांच्या पत्नीला मिळेल काय?
भाजपचे माजी नगराध्यक्ष हे पाहिजे तितके एक्टीव दिसले नाही. पालकमंत्री बावनकुळे यांनी त्यांना कामठी नगरपरिषद व येरखेडा नगरपंचायत येथे जबाबदारी दिली असल्याचे समजते.
उद्या विजयाचा गुलाल कोण उधळणार ?
महादुला नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध कांग्रेस अशी मुख्यतः लढत होती. त्यामुळे भाजप पुन्हा विजयाची हैट्रिक मारणार की सत्तापरिवर्तन करीत कांग्रेस सत्तेत येणार? ही एकच चर्चा सुरू आहे. उद्या विजयाचा गुलाल भाजप च्या हेमलता मनोज सावजी उधळणार की सुषमा रत्नदीप रंगारी गुलाल उधळणार हे उद्या जनतेला दिसणार आहे. जिंकुन कोणीही येवो पण महादुला शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हीच जनतेची अपेक्षा आहे.



































