श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची 40 एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त 500 रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणाऱ्या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या प्रीमियम भागात असलेली ही सगळी जमीन राज्य सरकारच्या मालकीची होती. तिची विक्री करण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. त्यामुळे केवळ मुद्रांक शुल्क बुडवण्या पुरते हे प्रकरण मर्यादित नसून सरकारी जमिनीची बेकायदा विक्री झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच ही जमीन खाजगी दाखवून विक्री करणाऱ्या शितल तेजवानी यादेखील प्रमुख आरोपी ठरू शकतात.
जमीन तीनशे कोटी रुपयांना खरेदी केली
मुंढवा येथील 40 एकर जमीन पार्थ पवार यांनी मे 2025 मध्ये खरेदी केली होती. यातील महार वतनदार असलेल्या हक्कदारांनी यासाठीचे कुलमुखत्यारपत्र हे शितल तेजवानी यांना दिले होते. याच कुलमुखत्यार पत्राच्या आधारे पार्थ पवार यांनी त्यांच्याकडून ही जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवले. प्रत्यक्षात ही जमीन सरकारने 1988 मध्येच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला पन्नास वर्षांच्या भाडेकरारने दिली आहे. या जमिनीची मालकी बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाकडेच आहे. कागदपत्रे देखील महाराष्ट्र सरकारचे नाव आहे. प्रत्यक्षात तेजवानी यांनी कोणताही अधिकार नसताना ही जमीन बाजारात विक्रीला आणली आणि पार्थ पवार यांनी ती विकत घेतली कशी, हाच मुख्य मुद्दा आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त 1 लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या 48 तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिका-यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतक-यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.



































