अजय कदम यांना उमेदवारी घोषित होण्याची दाट शक्यता!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपूर : 7 नोव्हेंबर 2025
कामठी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरिएमं नेत्या अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी 1 महिन्याआधीच अजय कदम यांचे नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. सातत्याने सामान्य नागरिकांच्या सुखादुखात सक्रिय असणारे व सामाजिक धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांच्या गत 2017 च्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असतांना अल्पशः मताने पराभव झाला होता. परंतु त्यांनी त्यांचा जनसंपर्क निरंतर कायम ठेवला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी येथील शासकीय निवासस्थानी माजी राज्यमंत्री बरिएमं नेत्या अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी कामठी नगरपरिषद येथे भाजप बहुजन रिपब्लिकन एकता मंच संयुक्तपणे निवडणूक लढणार असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजय कदम यांना उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत चर्चा करण्यात आली.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजय कदम यांना भाजप- बरिएमं युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्याचे संकेत दिले. मागील पंधरा वर्षांपासून बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहे. वैचारिक मतभेद असूनसुद्धा बहुजन रिपब्लिकन एकता मंच सातत्याने भाजपसोबत आहे. गेल्या टर्मची निवडणूक भाजप युतीमध्ये लढविण्यात आली होती. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे संयुक्त उमेदवार म्हणून स्वच्छ प्रतिमेचे अजय कदम यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती व त्यांनी 14000 पेक्षा जास्त मते घेतली होती. त्यावेळी रणजीत सफेलकर यांनी बंडखोरी केल्यामुळे फार थोड्या मताने अजय कदम यांचा पराभव झाला होता. येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण नगराध्यक्षाचे आरक्षण असल्यामुळे अजय कदम यांना पुन्हा संधी देण्यात यावी अशी विनंती ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिष्टमंडळात बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे विदर्भ महासचिव व कामठी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय कदमसह विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष राहुल बागडे इत्यादी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्याचा समावेश होता.

































