बावनकुळे यांच्या मौखिक निमंत्रणा नंतरही अनुपस्थिती; राज्यभर संताप
Vansh News Digital Web portal online services.
(गजानन ढाकुलकर) नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, विधान भवन परिसरात स्वतः महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार मित्रांना “सोमवारी सकाळी 11 वाजता कोराडी मंदिरात या” असे थेट मौखिक निमंत्रण दिले. इतकेच नव्हे तर, आपल्या सहायकांनाही पत्रकारांना निमंत्रित करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
मंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जवळजवळ 30 पेक्षा अधिक पत्रकारांनी आपापले महत्त्वाचे कार्यक्रम, मुलाखती, नियोजित बातम्या रद्द करून अगदी वेळेवर 11 वाजता कोराडी मंदिरात हजेरी लावली.
मंदिर समिती अध्यक्षाचे सहकारी डाफ यांनी पत्रकारांना बसण्याची व्यवस्था केली, देवीचे दर्शन घडविले आणि महाप्रसाद दिला—मात्र ज्यांच्या शब्दामुळे पत्रकार तिथे जमले, ते मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे हेच कार्यक्रमाला फिरकले नाहीत!


मंत्र्यांचा शब्द पत्रकारांसाठी कवडीमोल ठरला का?
1) शहरात मंत्री महोदयांचे इतर कार्यक्रम होते, हे नंतर समोर आले. मग हा प्रश्न उपस्थित होतो की —
हे आधीच माहीत असताना पत्रकारांना का बोलावले गेले?
2) पगारी सहायकांनी मंत्री महोदयांना ही वस्तुस्थिती का सांगितली नाही ?
3) की पत्रकारांची वाट पाहणे हेच महत्त्वाचे नव्हते?
“आम्ही केवळ मा. बावनकुळे यांच्या शब्दावर आलो. इतर कार्यक्रमांना नकार दिला. पण आमच्यासाठी एक मिनिटही न काढणे हा सरळसरळ अपमान आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया उपस्थित काही पत्रकारांनी व्यक्त केली.
हा केवळ नियोजनाचा घोळ की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
राज्यात पत्रकार स्वातंत्र्य, सन्मान आणि विश्वासाबाबत मोठमोठी भाषणे दिली जातात. पण प्रत्यक्षात मंत्र्यांचा शब्दच जर पाळला जात नसेल, तर पत्रकारांनी नेमका विश्वास कोणावर ठेवायचा ?
हा प्रकार हेतुपूर्वक दुर्लक्षाचा आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राजकीय शब्दाला किंमत नसेल, तर लोकशाही टिकणार कशी?
सार्वजनिक जीवनात शब्दाला वजन असते. मंत्री स्तरावरील व्यक्तीचा शब्द जर पाळला जात नसेल, तर तो केवळ राजकीय औपचारिकता ठरतो का, हा सवाल राज्यभर चर्चेत आहे.
या घटनेमुळे नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळण्याची शक्यता असून, मंत्री महोदय यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



































