जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
VANSH NEWS Digital web portal online service
गडचिरोली :-20 मार्च 2025
जिल्ह्यातील एटापल्ली वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लाकडतस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 12 मार्च रोजी रात्री छत्तीसगड राज्यात अवैधरीत्या लाकूड घेऊन जाणारा एक ट्रक तांत्रिक बिघाड झाल्याने रस्त्यावर थांबला आणि त्यामुळे ही तस्करी वनविभागाच्या निदर्शनास आली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते ही लाकडतस्करी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि लाकडाची वाहतूक सुरू असताना वनविभागाने यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अवैध वृक्षतोड आणि तस्करीमुळे पर्यावरणाच्या समतोलावर गंभीर परिणाम होत असून, नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयात अनुपस्थिती ही तस्करांसाठी संधी ठरत आहे. बहुतांश अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात वास्तव्य करत नसल्याने जंगलावर प्रभावी नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे तस्कर मोठ्या प्रमाणावर झाडे तोडून वाहतूक करत आहेत. स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही वनविभागाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत. परिणामी, तस्करांना अधिक मोकळीक मिळाली असून, जंगलसंपत्तीचा प्रचंड ऱ्हास सुरू आहे. जर वनविभागाने वेळीच ठोस उपाययोजना राबवल्या असत्या आणि जबाबदारी निश्चित केली असती, तर ही परिस्थिती टाळता आली असती. त्यामुळे आता नागरिक वनविभागाच्या निष्क्रीयतेवर संतप्त प्रतिक्रिया देत असून, तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
