श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक – VANSH NEWS Digital web portal online
नागपूर : 7 एप्रिल 2025.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी. जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उददेशाने दरवर्षी 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत राज्यात “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर सामाजिक समता सप्ताह” साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने 8 ते 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन व भारतीय संविधानाची उदेशिका /प्रस्ताविका यांचे वाचन करुन भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी या कार्यालयाअंतर्गत शासकीय वसतीगृहे/निवासी शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाटय स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
10 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत मार्जिन मनी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. 12 एप्रिल रोजी संविधान जागर- भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देण्यासाठी संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषत: मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित केले आहे.
13 एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतीगृहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. सोबतच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, निवासी शाळा, महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व व्याख्याने, चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
