मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून शेतकरी होणार समृद्ध!
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378!/9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
मुंबई दि. 4 एप्रिल 2025
शेतकऱ्याला शेतापर्यंत पोचण्यासह कृषी यंत्रसामग्री सहज वाहून नेहता आली पाहिजे. यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची अवस्था खराब असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर सरकारने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल दि. 3 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसूली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील.
महामार्ग एवढेच शेतरस्ते महत्त्वाचे
महामार्ग विकसित करण्यासारखेच शेतरस्त्यांच्या विकासालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. शेतापर्यंत रस्ता असल्यास शेतमाल वाहतूक करणे सोपे होते आणि शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीचा वापरही सहज शक्य होतो.
शासन निर्णयामुळे पाणंद रस्त्यांचा विकासाला बळकटी
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांमध्ये जाण्यासाठी सोपा मार्ग उपलब्ध होणार असून, शेतीचे उत्पादन आणि कार्यक्षमता वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल आणि गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. हा निर्णय शेतकरी, ग्रामपंचायती आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
पाणंद रस्ते योजनेचे फायदे
• शेतीच्या शिवारात जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध होतात, ज्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी, टेम्पो, आणि इतर वाहने सहज जाऊ शकतात.
• शेतमाल वाहतुकीसाठी रस्ते सोपे होतात, ज्यामुळे मालाची गुणवत्ताही टिकून राहते.
• शेतीमाल गतीने बाजारपेठेत पोहोचवता येतो, त्यामुळे योग्य दर मिळतो.
• वाहतुकीचा खर्च कमी झाल्यामुळे नफा वाढतो.
• चिखल, दलदलीमुळे होणाऱ्या अडचणी टाळता येतात.
• रस्त्यांवर पाणी साचत नाही, त्यामुळे वाहतूक सतत सुरू राहते.
• गावांना शहरांशी जोडणारे रस्ते सुधारल्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळते.
• ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्रे आणि इतर शेतीसाठी लागणारी अवजारे सहज शेतात नेता येतात.
• वेळ आणि मजुरी वाचते, ज्यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरते.
• शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक खते, बियाणे, औषधे इत्यादी वाहून नेण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे आहेत.
• हे रस्ते गावकऱ्यांसाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करतात. शाळा, दवाखाने, बाजारपेठ यांना जोडण्यासाठी हे रस्ते उपयोगात आणले जातात.
• आपत्तीच्या वेळी मदत व बचावकार्य जलद पार पाडण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे ठरतात.
• लहान उद्योग, डेअरी व्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि अन्य ग्रामीण व्यवसायांसाठीही हे रस्ते अत्यंत उपयुक्त असतात.
