श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News digital media services
रामटेक /नागपूर : 13 जुन 2025
शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल देवलापार मंडळातील शेतकऱ्यांनी शेतकामाला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या हंगामाचा धानाचा बोनस सरकारकडून अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे क्षेत्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.आतापर्यंत शेतकऱ्यांना धानाचे बोनस प्राप्त होणे अपेक्षित होते.मात्र राज्य सरकारकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ऐन पेरणीच्या पार्श्वभूमीवर गरीब शेतकऱ्यांना बी- बियाणे घेण्यासाठी पैसेच नसल्याचे ते सांगत आहेत.त्यामुळे देवलापार क्षेत्रातील शेतकरी लोकप्रतिनिधी व राज्य सरकारवर तीव्र नाराज आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना वेळेवर बोनसची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.जून महिना संपत आला असला तरी अजूनपर्यंत याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.देवलापार क्षेत्रातील गरीब शेतकरी मोहफुल व तेंदुपत्ता या वनोपजाच्या आर्थिक प्राप्तीवर अवलंबून राहतो.मोहफुल व तेंदुपत्तातून कमावलेल्या पैशांनी शेतकरी वर्ग शेतीचे नियोजन करतो.परंतु हल्लीच्या वर्षात वाघ,बिबट्या या हिंस्र वन्यप्राण्यांनी क्षेत्रात हाहाकार उडवल्यामुळे मोहफुल,तेंदुपत्तापासून शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या आर्थिक उत्पन्नतेवर मोठा परिणाम पडला आहे.यामुळे ऐन शेतीच्या कामाच्या दिवसात शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे.

राजकीय नेते निवडणुकीच्या पूर्वी आदिवासीबहुल क्षेत्रातल्या भोळ्या भाळ्या जनतेला भाराभर आश्वासने देतात आणि निवडून आल्यावर लक्ष देणे सोडतात अशाप्रकारचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
बेलदा येथील माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकचे संचालक उमेश भांडारकर,बेलदा येथील प्रगतिशील शेतकरी गणेश अवथरे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुंदन राऊत,देवलापार येथील पापा भाई,जय भलावी,पिंडकापार येथील राजेश उईके, जंगलु मरसकोल्हे,गुंडेलाल उईके, छवारी येथील भाकरती बोपटे यांच्यासह देवलापार क्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी राज्य सरकारने आतापर्यंत धानाचा बोनस दिला नसल्यामुळे संताप व्यक्त केला. शेतकरी काबाळकष्ट करून सर्वांचे पोट भरावे म्हणून पिके उत्पन्न करतो आणि नेते,सरकार शेतकऱ्यांच्या काबाळकष्टाचे वेळेवर पैसे न देऊन एकप्रकारे शेतकऱ्यांच्या श्रमाचे अपमानच करतात अशाप्रकारची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी विरोधकांनाही धारेवर धरले.शेतकऱ्यांच्या धानाच्या बोनसच्या बाबतीत सरकार काही कार्यवाही करताना दिसत नाही.मात्र विरोधकही याबाबतीत काही बोलायला तयार नाहीत असा संताप गणेश अवथरे यांनी व्यक्त केला.तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी हेही आश्वासन पूर्ण केले नसल्याचे उमेश भंडारकर म्हणाले.


राज्यमंत्री आशिष जयस्वाल मुख्यमंत्री आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात.मग त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा बोनस लवकर मिळण्याबाबत ते का पाठपुरावा करत नाहीत ? असा सवाल कुंदन राऊत यांनी उपस्थित केला.
रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल कृषी राज्यमंत्री आहेत.ते शेतकरीबहुल विधानसभा मतदारसंघातून निवडून जात असल्याने त्यांना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणींची चांगली जाण आहे.निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील असा आशावाद अजुन ही शेतकऱ्यांनी सोडला नाही.
शेतकऱ्यांना दानाचा बोनस न मिळाल्यास येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षावर याचा विपरीत परिणाम होईल असे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
सरकारने आता तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना ध्यानाचा बोनस त्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
