श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर 4 आँक्टोबर 2025
69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कामठी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे देशभरातून लाखो अनुयायी भाविकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. यावेळी अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून नगर परिषद कामठी तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाने उल्लेखनीय आणि प्रशंसनीय अशी तयारी केली होती.
पहिल्यांदाच नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने अनुयायांची अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध रित्या सोय केली. ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने दाखवलेले समन्वयाचे उदाहरण सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरले आहे. परिसरात स्वच्छता कायम राखण्यासाठी नगर परिषदेकडून परिसरातील प्रत्येक रस्त्यावर कचरा संकलन करणारी घंटा गाडी सातत्याने फिरविण्यात आली. रस्त्यावरील कचरा तत्काळ संकलित करून परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात आला. त्यामुळे या काळात ड्रॅगन पॅलेस परिसरात एकाही ठिकाणी कचरा पडलेला आढळला नाही, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
कामठी नगर परिषदेकडून लाखो अनुयायांना पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयांची सुविधा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, प्रकाश व्यवस्था, तसेच ठिकठिकाणी आरोग्यविषयक सुविधा यासह विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे, नगर परिषदेने ड्रॅगन पॅलेस परिसरात एक विशेष नियंत्रण कक्ष (ऑफिस) उभारले होते. या कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणेचे समन्वयन करण्यात आले. पाणीपुरवठा, स्वच्छता, तातडीच्या दुरुस्ती, आरोग्य सेवा आदी सर्व विभागांमध्ये अखंड संवाद व समन्वय ठेवून हे नियंत्रण कक्ष कार्यरत होते. त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होताच तत्काळ उपाययोजना केली गेली आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला नाही.
दुसरीकडे, स्थानिक पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन केले. कामठीच्या दोन्ही पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेच्या जवानांनी ठिकठिकाणी तैनात राहून वाहतूक कोंडी होऊ न देण्यासाठी विशेष दक्षता घेतली. लाखो भाविकांची गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही, ही प्रशासनाच्या समन्वयाची मोठी कामगिरी ठरली. याशिवाय हरवलेल्या भाविकांना शोधून त्यांच्या नातेवाईकांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याचे मानवतावादी कार्यही पोलीस प्रशासनाने केले.

या उत्कृष्ट व्यवस्थापनाचा गौरव करण्यासाठी आज रविवार रोजी ड्रॅगन पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, पोलीस उपायुक्त निकेतन कदम, तसेच नवीन व जुना कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ॲड. सुलेखा कुंभारे यांनी सांगितले की, “दरवर्षी लाखो अनुयायांचे स्वागत, व्यवस्थापन आणि सुरक्षेची जबाबदारी प्रशासन अतिशय प्रामाणिकपणे पार पाडते. अशा सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून केलेल्या योगदानाचा गौरव व्हावा, तसेच यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करावी,” अशी मागणी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
या उपक्रमामुळे कामठी नगर परिषद आणि पोलिस प्रशासन यांनी पुन्हा एकदा आपली जबाबदारी, संवेदनशीलता आणि समर्पण सिद्ध केले आहे. लाखो अनुयायांसाठी त्यांच्या या सेवाभावाचे समाजभर कौतुक होत असून, ही समन्वयाची भावना आगामी काळातही कायम राहावी, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांचे गठण करण्यात आले. या समितीत प्रदीप भोकरे, गौरव शर्मा,शुभम ताकभावरे, दीपक जैस्वाल , अक्षीश मलिक यांचा समावेश करण्यात आला होता.


































