नागपुर : 5 आँक्टोबर 2025
सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोरने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.सर्वोच्च न्यायालयात एका माथेफिरू वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई (Chief Justice BR Gavai) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असुन या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरन्यायाधीश बी.आर गवई यांचेवर हल्ला करण्याचे नेमके कारण काय? त्या माथेफिरू वकिलाच्या मागे कोणती शक्ती तर नाही ना? या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशीही मागणी अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अनमोल अशा भारतीय संविधानावर थेट हल्ला असुन या घटनेतील आरोपी वकिल राकेश किशोर याची सुप्रीम कोर्टातील वकिलीची सनद रद्द करावी व आरोपी माथेफिरू वकिल राकेश किशोरवर कडक फौजदारी कारवाई करावी जेणेकरून यानंतर सुप्रिम कोर्टाची व सरन्यायाधीश यांच्या पदाची प्रतिष्ठा राखली जावी असेही अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी सांगितले.

































