ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल चे थाटात उद्घाटन
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 5 नोव्हेंबर 2025
शांती, मैत्री आणि मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल फेस्टिवल सोहळ्याचा आज भव्य शुभारंभ झाला. जपान येथील मिनोबुसन क्योनजी विहाराचे प्रमुख आणि निचिरेनशू बुद्ध धर्माचे मुख्य संचालक भंते तेनजेन हामाजीमा ग्योहो उचियामा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या तीन दिवसीय सोहळ्यात जपान, श्रीलंका आणि भारतातील बुद्ध भिक्षु संघ तसेच असंख्य अनुयायी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना भंते तेनजेन हामाजीमा म्हणाले, “ड्रॅगन पॅलेस हे फक्त एक वास्तू नाही, तर ते जपान–भारत मैत्रीचे आणि जागतिक शांतीचे प्रतीक आहे. मॅडम नोरीको ओगावा आणि ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी प्रेम, करुणा आणि समतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचे कार्य केले आहे. गेल्या 25 वर्षांत या पवित्र स्थळाने जगभरातील लाखो लोकांच्या मनात करुणेचा दीपस्तंभ प्रज्वलित केला आहे.”
ते पुढे म्हणाले की, मिनोबुसन विहारामध्ये आज युरोप, रशिया, युक्रेन, इस्रायल आणि भारतातील लोक एकत्र प्रार्थना करतात. जात, धर्म आणि राष्ट्र यांतील भिंती मोडून मानवतेच्या एकत्रित सुखासाठी प्रार्थना करणे हेच बुद्ध धर्माचे हृदय आहे. आपण एकत्र जगलो, एकत्र समृद्ध झालो, तरच जग शांत होईल.”
भंतेजींनी भारतातील बौद्ध परंपरेचे आणि नागपूरजवळील दीक्षाभूमीचे विशेष कौतुक करत सांगितले की, “या भूमीतच तथागत बुद्धांचा शांती आणि समानतेचा संदेश जन्मला. आज त्याच भूमीतून जगाला पुन्हा करुणेचा किरण उजळत आहे.” शेवटी त्यांनी ड्रॅगन पॅलेसच्या समृद्धीसाठी आणि उपस्थित सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.



“ ड्रॅगन पॅलेस ची निमिर्ती हिच माझ्या जीवनातील सर्वोत्तम उपलब्धी “— ॲड. सुलेखाताई कुंभारे
या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी भावनिक आणि प्रेरक प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समानतेचा मार्ग दाखवला. त्यांचा शांती आणि मानवतेचा विचार प्रत्येकाच्या आचरणात उतरवणं खरी बौद्धता आहे. ड्रॅगन पॅलेस ची निर्मिती हीच माझ्या जीवनातील सर्वोत्तम उपलब्धी आहे असे ऍड सुलेखा ताई या प्रसंगी म्हणाल्या.
सुलेखाताईंनी मॅडम नोरीको ओगावा यांच्या स्मृतींना अभिवादन करत सांगितले की, “भाषा कळत नसतानाही मनांच्या भाषेने आमची मैत्री झाली. आणि या मैत्रीतुन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस चे निर्मिती झाली.”
त्यांनी पुढे सांगितले की, “धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखो लोक दीक्षाभूमी सोबतच ड्रॅगन पॅलेसला भेट देतात. हे फक्त निव्वळ धार्मिक स्थळ नसून जपान–भारत मैत्रीचे, त्यागाचे आणि करुणेचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
जपानच्या मिनोबुसन विहाराचे भंते तेनजेन हामाजीमा ग्योहो उचियामा यांची उपस्थिती
श्रीलंका येथून भंते आर्य धम्मा यांचे मार्गदर्शन
ॲड. सुलेखाताई कुंभारे यांचे ‘धम्मकार्य हेच जीवन’ या विचारांवरील प्रेरणादायी भाषण
ड्रॅगन पॅलेस टेंपल आज भारत-जपान मैत्रीचे प्रतीक, जागतिक शांतीचा केंद्रबिंदू आणि करुणेचा दीपस्तंभ म्हणून उजळत आहे, ज्याच्या ज्योतीतून विश्वभरातील लोकांना शांततेचा, मैत्रीचा आणि मानवतेचा मार्ग सापडतो आहे.
यावेळी जपान येथून आलेले भन्ते यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला भंतेजी ग्योहो उचीयामा, केन्सो होशिनो, शोकोह शिन्मा, युकी इतो, केइजी साकुराई यांच्यासह २० हून अधिक जपानी भिक्षू सहभागी झाले. शिंग्यो इमाई (मलेशिया) आणि भदंत संघसेना (भारत) यांचाही विशेष सहभाग होता.
सुरवातीला ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये जपानी भंते आणि ड्रॅगन पॅलेस टेंपल च्या प्रमुख ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली.
मुख्य समारंभाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून त्यांना मानवंदना देऊन करण्यात आली. हरदास हायस्कूल व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थिनी “ड्रॅगन पॅलेस टेंपल महान” या गीतावर स्वागत नृत्य सादर केले. शाळेतीलच विद्यार्थिनींनी मन शुद्ध है, तन बुद्ध है, मन बुद्ध है, तन शुद्ध है ” तसेच “बुध्दम शरणं गच्छामी” या गीतावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ज्युडो कराटे चे प्रात्यक्षिक सुद्धा सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन सुमेधा नगरकर तर आभार प्रदर्शन अजय कदम यांनी केले. यावेळी अजय कदम दिपंकर गणवीर, उदास बंसोड, अंकुश बांबोर्डे, अनुभव पाटील, तिलक गजभिये, अफजल अंसारी, राहुल बागडे, सुभाष सोमकुवर, दिनेश बन्सोड, रवी रंगारी, दीपक सिरिया, विष्णु ठवरे, वंदना भगत, नंदा गोडघाटे, भीमराव फुसे, डॉक्टर सुरेंद्र वानखेडे, रेखा भावे, रजनी लिंगायत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



































