श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
नागपूर, 15 नोव्हेंबर 2025.
नागपुर जिल्ह्यातील रामटेक शहराच्या पर्यटनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करित मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगार च्या संधी उपलब्ध करून देणारे रामटेक येथील पर्यटक मित्र, प्रख्यात व्यक्तिमत्त्व तसेच कांग्रेस चे जेष्ठ नेते चंद्रपाल चौकसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काल अधिकृतपणे प्रवेश केला.

चंद्रपाल चौकसे हे कांग्रेस पक्षात निष्कलंक व्यक्तिमत्व होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागपुर शहर व ग्रामीण भागात प्रभावशाली चेहरा नव्हता. पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश होताच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. चंद्रपाल चौकसे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने नागपूर आणि रामटेक क्षेत्रातील राजकीय समिकरण पूर्णतः बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मुळात काँग्रेस पक्षाशी जुळलेल्या चंद्रपाल चौकसे यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढत दिली होती. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाला रामटेक विधानसभा सीट महाविकास आघाडीने सोडली होती. परंतु कांग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक व चंद्रपाल चौकसे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. राजेंद्र मुळक व चंद्रपाल चौकसे या दोघांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून कांग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली. विधानसभा निवडणुकीनंतर कांग्रेस पक्षाने मुळक यांचे निलंबन मागे घेतले परंतु चंद्रपाल चौकसे यांचे निलंबन मागे घेतले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश देत समाजाची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल चंद्रपाल चौकसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विशेष आभार मानले. पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या पक्षप्रवेशावेळी पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन,जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर ,कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पर्यटनाच्या माध्यमाने रामटेक परिसरात डॉलरचा पाऊस पडू शकतो,एवढी क्षमता असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने रामटेक क्षेत्राच्या सर्वागिण विकासावर भर देणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवणार असे यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी व्यक्त केले.

पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरारी देण्याचे कार्य करतील अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आशा आहे.




































