पाहिल्या टप्प्यात 1 हजार 600 बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे धनादेश वाटप
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी /नागपुर : 30 आँक्टोबर 2025
जिल्हा खनिज प्रतिष्ठान, जिल्हा परिषद नागपुरच्या वतीने आज कोराडी देवस्थानातील ज्योती भवन येथे महिला सबलीकरण व्हावे याकरिता ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी मोठा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला.
यावेळी बोलताना वित्त राज्यमंत्री ना. अँड. आशिष जयस्वाल म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मायक्रोफायनान्स मधील क्लीष्ट प्रक्रिया हा एक मोठा अडसर होता. यामुळे अनेक महिलांना नियमांच्या चौकटीत पात्र होऊन व्यवसायाला आकार देतांना दमछाक व्हायची. परिणामी गावात विशेषत: खेड्यांमध्ये लहान मोठ्या व्यवसायाच्या भांडवली गुंतवणूकीबाबत अडथळा निर्माण झाला होता. तो अडथळा या नवसखी उद्योगिनी योजनेतून दूर होत असून महिलांसाठी प्रगतीचे एक नवे दालन सुरु झाल्याचे प्रतिपादन वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
सामाजिक न्यायासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबध्द आहे. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपण ई-रिक्षाचे वाटप केले. सायकलींचे वाटप केले. उद्योग व्यवसायासाठी गाडे दिले. ज्या महिला आपल्या कौशल्याच्या बळावर मोठ्या हिमतीने उभ्या आहेत, विविध उत्पादने करीत आहेत अशा महिला बचत गटांच्या उत्पादनांना महानगरातील ग्राहकांपर्यंत पोहचता यावे यादृष्टीने राज्यात 10 उमेद मॉल साकारत असल्याचे ते म्हणाले.
या नवीन योजनेमार्फत महिला बचत गटांना जो निधी मिळणार आहे तो महत् प्रयासातून मिळविलेला आहे. याची जाणिव बचत गटांनी ठेवून या 1 लाखाचे 2 लाख, दोनचे चार लाख कसे होतील हे ध्येय निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले. या निधीतील एकही पैसा इतरत्र आम्ही खर्च करणार नाही अशी शपथ सर्वांनी या कार्यक्रमात घेतली.


यावेळी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे व आमदार चरणसिंह ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले.



































