श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378)
मुख्य संपादक
Vansh News Digital Webportal online
कामठी /नागपुर ;15 सप्टेंबर 2025
सात वर्षांपासून रखडलेला रमानगर उड्डाणपूल अखेर साकार होण्याच्या मार्गावर असून येत्या 26 सप्टेंबर रोजी या उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे.
कामठी शहरातील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दररोज देश-विदेशातून हजारो अनुयायी दर्शनासाठी येतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या काळात तर जवळपास 10 लाख अनुयायींची गर्दी उसळते. रेल्वे अंडरपासमधून मोठ्या बसेस जाऊ शकत नसल्याने तसेच मेट्रोच्या कामामुळे कामठी मार्ग एकेरी झाल्याने जयस्तंभ चौक ते रमा नगर रेल्वेमार्गावरील आर.ओ. बी. चे काम 7 वर्षांपासून रखडले होते. यामुळे अनुयायींना आणि सिटी बससेवेला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
ही समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री अँड.सुलेखाताई कुंभारे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले होते.


त्यानंतर 12 जुलै 2025 रोजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रमानगर येथील उड्डाणपुलाच्या कामाप्रसंगी अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री, माजी मंत्री अँड. सुलेखा कुंभारे व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात काम करणाऱ्या एजन्सीवर चौकशी व दंडात्मक कारवाई करून उड्डाणपूल धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. माजी राज्यमंत्री कुंभारे यांनी 25 सप्टेंबरपूर्वी उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून सुरू करण्याचे पत्र शासनाला दिले होते. रविवारी नागपुर चे पालकमंत्री,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रमा नगर उड्डाणपुलाची पाहणी केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी हा पूल सुरू करण्याचे ठरविले आहे. उर्वरित 15 कोटींचे काम गजदगतीने पूर्ण करून 26 सप्टेंबरला लोकार्पण भव्य थाटात करण्यात येईल.
यावेळी पोलिस उपायुक्त , उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रमा नगर उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यानंतर दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटणार असून लाखो अनुयायींच्या प्रवासाला नवा वेग मिळणार आहे.


































