श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web portal online
चौंडी : 6 मे 2025
सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, कार्यकर्त्यांच्या हक्काचे दान त्यांच्या पदरात टाकले आहे. हा निर्णय लोकशाहीला बळकट करणारा असून, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा ठरेल, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, चौंडी येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान हा निर्णय आल्याने या पावनभूमीचा मान वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
बावनकुळे म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा हा निर्णय घेतला आहे. मी न्यायालयाचे मन:पूर्वक स्वागत करतो,” या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. “कार्यकर्ते तन-मन-धनाने समाजसेवा करतात. आज त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू नक्कीच फुलले असेल,” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख करत बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी कायदेपंडितांशी सतत सल्लामसलत करून हा विषय मार्गी लावला. त्यांच्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला आणि मुख्यमंत्र्यांच्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाला या निवडणुका गती देतील.”
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आजच्या न्यायालयीन निर्णयाने जनतेच्या आशा-आकांक्षांना बळ मिळाले आहे. “हा निर्णय कार्यकर्त्यांचा आहे. येणारी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्या समर्पणाला आणि सेवेला हा विजय आहे,” असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले. न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या या पावनभूमीत हा निर्णय आला, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे,” असे बावनकुळे यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, विकासाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
