80 देशातील प्रतिनिधी राहणार उपस्थित
श्री.सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
VANSH NEWS Digital web online
कामठी/नागपुर: 4 मे 2025
युनायटेड नेशन डे व वैशाख 2025 या मंगलपर्वावर व्हिएतनाम येथे दिनांक 6 मे ते 8 मे 2025 या कालावधीत आयोजित आंतरराष्ट्रीय बौध्द परिषदेकरिता भारतीय प्रतिनिधी म्हणून ॲड. सुलेखाताई कुंभारे यांना विशेष निमंत्रण म्हणून व्हिएतनाम देशाने निमंत्रित केले आहे. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारतासह जवळपास 80 देशांतील प्रतिष्ठित प्रतिनिधी, आदरणीय बौध्द नेते, विद्वान अभ्यासक, विचारवंत आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत.
जगतिक स्तरावरील या परिषदेत मानवी उत्कर्षासाठी बौध्द तत्वज्ञान, जागतिक शांती, करूणा, मैत्री, एकता, सांप्रदायिक सद्भाव, सामंजस्याचे मार्ग, शाश्वत मानवी भवितव्यासाठी शैक्षणिक सजगता, जागतिक सुसंवाद इत्यादी महत्वाच्या विषयांवर विचारमंथन होणार आहे. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत ॲड. सुलेखाताई कुंभारे ह्या ‘मानवी प्रतिष्ठा, एकता, सार्वभौमता, जागतिक शांतता, आणि मानवी विकासासाठी बौध्द अंतर्दृष्टी या विषयावर मौलिक आणि मूलभूत विवेचन करणार आहेत. सोबतच भारताबरोबरच संपूर्ण जगभरातील बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांना सोपविण्याच्या संदर्भातील विषयसुध्दा आपण आंतरराष्ट्रीय पटलावर विशेषत्वाने मांडणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी यापूर्वी अमेरिका येथील न्यूयॉर्क, चिन येथ्झील बिजिंग, जपान येथील हिरोशिमा नागासाकी, थायलंड, म्यानमार, श्रीलंका इत्यादी ठिकाणी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन बौध्द धम्माचे तत्वज्ञान जगभर पसरविण्याचे महनीय कार्य केले आहे. व्हिएतनामतर्फे सदर परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान त्यांना मिळाला, ही देशासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
दिनांक १२ व १३ मे रोजी बौध्दगया येथे ॲड. सुलेखाताई कुंभारे राहणार उपस्थित
बुध्द जयंती निमित्त दिनांक 12 व 13 मे 2025 रोजी बुध्दगया येथील महाबोधी महाविहार येथील विशेष बुध्द वंदनेत तसेच गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या सर्मथनात ॲड. सुलेखाताई कुंभारे उपस्थित राहतील.
