बरिएमं तर्फे नगराध्यक्ष पदासाठी अजय कदम यांचे नामांकन दाखल
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कामठी /नागपुर : 17 नोव्हेंबर 2025
नागपूर जिल्ह्य़ातील बरिएमं हा भाजप महायुतीच्या मित्रपक्षातील 15 वर्षापेक्षा जुना मित्रपक्ष आहे.मागील 15 वर्षापासुन स्थानिक स्वराज्य संस्थां, विधानसभा, लोकसभा निवडणुका बरिएमं युतीत भाजप लढत आहे. परंतु कामठी शहरात 15 हजारापेक्षा जास्त मतांनी पीछेहाट झालेले भाजपचे आ. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या निराशमय स्थितीत असल्याने ते वारंवार कामठीतील जनता त्यांना मागे ठेवते अशी खंत सार्वजनिक व्यासपीठावरुन व्यक्त करतात. 15 दिवसांपुर्वी तर पालकमंत्री बावनकुळे म्हणाले तुम्ही मला असेच मागे ठेवाल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला संपुर्ण 34 जागा देऊन टाकु. यावरुन पराभवाच्या भीतीने त्यांनी लढण्याआधीच आपले हथियार टेकले की काय? अशी जनतेत चर्चा सुरू झाली.कामठी नगर परिषद निवडणुकीत आज मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. अखेरच्या दिवशी बहुजन रिपब्लिकन एकता मंच (ब.रि.ए.म.) तर्फे अजय कदम यांनी नगराध्यक्ष पदाचे नामांकन दाखल करून या लढतीला नवे वळण दिले.


याआधी युती कायम राहील, अशी घोषणा स्वतः माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केली होती. परंतु भाजपकडून नगराध्यक्ष उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी ब.रि.ए.मं. सोबत कोणतीही चर्चा न झाल्याने नाराजीची लाट उसळली.
भाजपने 17 प्रभागांमधून सर्व 34 नगरसेवक उमेदवारी स्वतःच्या नावावर दाखल करत, ब.रि.ए.म. ला एकही जागा न देता बरिएमं सोबत युतीत न लढण्याचा स्पष्ट संदेश दिला. यामुळे ब.रि.ए.म.च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. कामठी शहरात आणि विधानसभेत माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे यांना मानणारा वर्ग हा हजारोंच्या संख्येत आहे. ड्रॅगन पॅलेसच्या वर्धापनदिनानिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाततील अलोट गर्दी ही त्याचे उदाहरण आहे.

ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.त्या म्हणाल्या, “महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आमच्यासोबत साधी चर्चा करण्याची देखील गरज वाटली नाही. भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील प्रत्यक्ष संवाद टाळला. त्यातच बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर ‘युती होणार नाही’ असे स्पष्ट सांगितल्यानंतर आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळेच आम्हाला शेवटच्या क्षणी अजय कदम यांचे नामांकन दाखल करावे लागले.”
बावनकुळेंनी युतीधर्म पाळला नाही – सुलेखाताई कुंभारे
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी युती धर्म न पाळल्याबद्दल दुःख व्यक्त करताना सुलेखाताई कुंभारे पुढे म्हणाल्या, “बरिएम युती धर्म पाळणार होती, पण भाजपने युती धर्म पाळला नाही, हे आम्हाला वेदनादायक आहे. कामठीच्या विकासकार्यात वेग आणण्यासाठी, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी आम्ही लढणार आहोत.”
शहर विकास प्राधान्य —सुलेखाताई कुंभारे
ब.रि.ए.म. ची भूमिका स्पष्ट ॲड. कुंभारे यांनी पुढे सांगितले, “आमचं लक्ष्य केवळ कामठी शहराचा सर्वांगीण विकास. भ्रष्टाचारविरहित, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन हेच आमचं ध्येय आहे.” या घडामोडींनंतर कामठीतील नगरपरिषद निवडणूक आणखी रंगात येणार हे स्पष्ट झाले आहे. अजय कदम यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहे.



































