श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
कोराडी, 3 नोव्हेंबर 2025 :
राज्याला अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा देत पाच दशकांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करणाऱ्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा 51 वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोत्सात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मारुडकर (संचालक-संचलन) होते. प्रमुख अतिथी म्हणून अभय हरणे (संचालक-प्रकल्प), मनेष वाघीरकर (संचालक-वित्त), तसेच कार्यकारी संचालक पंकज सपाटे, राजेश पाटील, आणि मुख्य अभियंते विलास मोटघरे, सुनील सोनपेठकर, विवेक रोकडे, शरद भगत, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षिय भाषणात संजय मारुडकर यांनी सांगितले की, “कोराडी केंद्राने मागील वर्षभरात विक्रमी वीज उत्पादन साध्य केले असून आता शाश्वत व दीर्घकालीन महत्तम वीज उत्पादन साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. पर्यावरणपूरक आणि खर्च-कार्यक्षम उपाय राबविणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदानच या प्रवासाला बळ देते.”
अभय हरणे यांनी महानिर्मितीच्या “व्हिजन 2035” नुसार नियोजित नव्या प्रकल्पांची माहिती देत कोराडी केंद्राकडून अधिक अपेक्षा असल्याचे नमूद केले. “कोराडी नेहमीच नवकल्पनांमध्ये आघाडीवर राहिले आहे,” असेही त्यांनी सांगितले.




मनेष वाघीरकर यांनी अलीकडच्या उच्चांक वीज निर्मितीबद्दल समाधान व्यक्त करत वाढीव कामगिरीतून पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्याचे आवाहन केले.
विलास मोटघरे, मुख्य अभियंता यांनी कोराडीची विक्रमी कामगिरी, आगामी योजनांचा आढावा आणि परिसरात निवासी संकुल, हॉस्पिटल, जलतरण तलाव, जिम्नॅशियम आदी आधुनिक सुविधांची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात कार्यकारी संचालक पंकज सपाटे, राजेश पाटील, पुरुषोत्तम वारजूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल-ताशा पथक, फटका शो, संगीत रजनी यांसह “हॅप्पी स्ट्रीट”, क्रीडा स्पर्धा, कला, मनोरंजन, “नॉन-स्टॉप 51”, कराओके शो, तसेच रक्तदान शिबिरात 76 पिशव्या संकलन अशी विविध आकर्षणे होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा घोंगडे आणि पूजा महल्ले यांनी केले. प्रास्ताविक संदीप ठाकरे यांनी मांडले, संदेश व पारितोषिक वितरणाचे समन्वयक प्रवीण बुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मयूर मेंढेकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी, विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी आणि वर्धापन दिन आयोजन समितीचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



































