श्री. सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
सावनेर/नागपुर : 3 ऑक्टोबर 2025
महाराष्ट्र राज्यात यंदा झालेल्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची वाटचाल बिकट झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हताश व उध्वस्त झालेले आहेत. त्यांना तात्काळ आर्थिक मदत व कर्जमाफीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आज सावनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. तहसीलदार कार्यालय, सावनेर येथे एक भव्य निवेदन देण्यात आले.
हे निवेदन कांग्रेस नेता सुनील केदार यांच्या स्पष्ट निर्देशानुसार तहसिलदारांना देण्यात आले असून त्यात शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा समजून घेत नाही. दिवसरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आसवे पुसण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आहे, मात्र त्यांच्याकडून फक्त आश्वासनांची खेळखंडोबा सुरू आहे.”

सरसकट कर्जमाफीची हाक
काँग्रेस कमिटीने आपल्या निवेदनात सांगितले की, “शेतकऱ्यांवर प्रचंड कर्जाचा डोंगर आहे. ओल्या दुष्काळामुळे ते कर्जफेडीच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांची आत्महत्या रोखता येणार नाही.”
कांग्रेस नेता खा. राहुल गांधींना दिलेल्या धमकीबाबत तक्रार
याच दिवशी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावनेर पोलीस स्टेशन येथेही एक निवेदन दिले. यात भाजपाचे कार्यकर्ते पिंटू महादेवम यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर प्रकरण मांडले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे कृत्य लोकशाहीविरोधी असल्याचे सांगून संताप व्यक्त केला.



































