“दुहेरी हत्याकांडातील” दोषींवर कठोर कारवाई करा: माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांची मागणी
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी/नागपुर :12 मार्च 2026 होळीच्या पूर्वसंध्येला शहरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील दुसऱ्या जखमी तरुणाचा, मोहित दहाट, याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच घटनेत दोन तरुणांचा बळी गेल्याने कामठी शहरात संतापाची लाट उसळली असून, या ‘दुहेरी हत्याकांड’ प्रकरणाने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
होळीच्या पूर्वसंध्येला काही समाजकंटकांनी नवीन कामठी येथील अगदी पोलिस चौकी समोरच केलेल्या भीषण हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर मोहित दहाट हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले होते. मात्र, गेले काही दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोहितची प्राणज्योत आज मालवली.
प्रशासनाला इशारा आणि मागण्या
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करताना ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:
पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीतील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलावीत.
त्वरीत अटक व कडक कारवाई:
स्थानिक पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांसह सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमान्वये कारवाई करावी.
पोलिस गस्त वाढवावी: शहरात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी संवेदनशील भागात २४ तास पोलिस गस्त तैनात करावी.
”कामठी सारख्या शांत शहरात सणासुदीच्या काळात अशा हिंसक घटना घडणे दुर्दैवी आहे. मोहित दहाटच्या मृत्यूने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. जर पोलिसांनी आणि शासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर सामान्य जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. प्रशासनाने या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा.”— ॲड. सुलेखाताई कुंभारे (माजी राज्यमंत्री)

































