श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपुर : 1 मार्च 2026.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील असलेल्या राऊळगाव येथील ‘एसबीएल’ (SBL) एनर्जी लिमिटेड या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत आज रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कामगारांचा समावेश असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्याचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना सकाळी 6ते 7 च्या सुमारास घडली. खाणींमधील खोदकामासाठी लागणारे ‘डिटोनेटर’ तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या वेळी संबंधित युनिटमध्ये 25 ते 30 कामगार कार्यरत होते. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि कंपनीच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सुरुवातीला एका महिला कामगाराचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते, मात्र जसजसे बचावकार्य पुढे सरकले, तसतसा मृतांचा आकडा वाढत गेला. आतापर्यंत 17 जणांनी या अपघातात आपला जीव गमावला आहे. काही मृतदेह गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत सापडले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार
या दुर्घटनेत 18 कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये सर्व महिला कामगारांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, त्यापैकी 4 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

प्रशासकीय कारवाई आणि मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) ची पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. स्फोटकांचा कारखाना असल्याने ‘पेसो’ (PESO) आणि ‘डिश’ (DISH) या तांत्रिक यंत्रणांची पथकेही तपासासाठी पाचारण करण्यात आली आहेत.
घटनेची सखोल चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
“नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, या भीषण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शोक प्रकट
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असुन शासनाने म्रृतांना 2 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
म्रृतकांना महाराष्ट्र शासनाने केली मदत जाहीर
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एस बी एल इंडस्ट्रीयल एक्सप्लोसिव्ह मॅन्यूफॅक्चरर या कंपनीत झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, संबंधित कंपनी देखील मृत नागरिकांच्या वारसांना आर्थिक मदत करेल.
- चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री,नागपुर
“नागपूर जिल्ह्यातील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. तसंच यातील जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!”
- रोहित पवार,आमदार



































