भाजपांतर्गत गटबाजीचा फटका, बहुमत मिळुनही भाजप उमेदवार हरला!
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online
भिवंडी-निजामपूर : 20 फेब्रुवारी 2026.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. राजकीय साठमारी आणि नाट्यमय घडामोडींनंतर नारायण चौधरी यांनी बाजी मारली असून, ते भिवंडीचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. या विजयामुळे भिवंडीच्या राजकारणात मोठे फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर पदी कॉंग्रेस प्रणित सेक्युलर फ़्रंट चे.नारायण चौधरी महापौर म्हणुन निवडुन आले.
महापौरपदासाठी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या मतदानामध्ये नारायण चौधरी यांना एकूण 48 मते मिळाली. त्यांनी सुरुवातीपासूनच मतदानामध्ये आपली आघाडी कायम ठेवली होती. दुसरीकडे, त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी विलास रघुनाथ पाटील यांना केवळ 25 मते मिळवता आली. तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्नेहल पाटील यांच्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली असता, त्यांना अवघ्या 16 मतांवर समाधान मानावे लागले. या आकडेवारीवरून नारायण चौधरी यांनी स्पष्ट बहुमताने विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वा. निवडणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर हात वर करून झालेल्या मतदानात नारायण चौधरी यांना 48 मते मिळाली. यात काँग्रेसच्या 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 नगरसेवकांचा समावेश आहे. महापौरपदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यात चौधरी यांचे 2 अर्ज होते. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. त्यात कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलिस एस्कॉर्टने येत असल्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी झाली. पण पिठासीन अधिकाऱ्यांनी प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला. अखेरीस 6 उमेदवारांनी माघार घेतली आणि स्नेहा पाटील (भाजप), नारायण चौधरी (सेक्युलर फ्रंट समर्थित) आणि विलास पाटील (शिंदे गट) अशी तिरंगी लढत झाली.
त्यात नारायण चौधरी यांना 48, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघी 16 मते पडली. शिंदे गटाच्या विलास पाटलांना 25 मतांवर समाधान मानावे लागले.
उमेदवाराचे पडलेली मते
नारायण चौधरी 48
विलास पाटील 25
स्नेहा पाटील 16
उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन
भिवंडीच्या उपमहापौरपदासाठीही तिरंगी लढत झाली. त्यात काँग्रेसच्या तारिक मोमीन यांना सर्वाधिक 43 मते मिळाली. तर शिंदे गटाच्या जावेद दळवी यांना 25 मते, तर भाजपच्या सुहास नकाते यांना 21 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाने भिवंडीत काँग्रेसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

काँग्रेसचा ‘चंद्रपूर’चा बदला पूर्ण
काँग्रेसने भिवडी – निजामपूर महापालिकेत नारायण चौधरी यांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त केली. या माध्यमातून काँग्रेसने चंद्रपूर महापालिकेत भाजपने केलेल्या दगाफटक्याचा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपने दिले कारवाईचे संकेत
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी नारायण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाचा व्हिप डावलणाऱ्या नगरसेवकांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणालेत.भाजप आमदार महेश चौगुले यांनीही चौधरी यांच्यासह बंडखोरांवर ‘व्हीप’ उल्लंघनांतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिलेत. त्यांच्या या इशाऱ्यानंतर भाजप या प्रकरणी कोणती भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



































