श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
नागपूर : 4 मार्च 2026.
आंबेडकरवादी चळवळीतील संघर्षशील कार्यकर्ते आणि आंबेडकरी साहित्यिक रणजीत मेश्राम यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे, अशी भावना काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
आज सकाळी आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन नेते प्रा. रणजित मेश्राम यांचे दुःखद निधन झाले. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, मेश्राम यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल प्रखरपणे पेटती ठेवली. अन्याय, विषमता आणि सामाजिक भेदभावाविरोधात त्यांनी लेखणी आणि कृतीच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला. आंबेडकरी साहित्याला त्यांनी दिलेले वैचारिक योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या लिखाणातून वंचित समाजाच्या वेदना आणि स्वाभिमानाचा स्वर ठळकपणे उमटत असे.
रणजीत मेश्राम हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते विचारांचे योद्धा होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने चळवळीतील एक निष्ठावंत, जिद्दी आणि अभ्यासू नेतृत्व हरपले आहे, असेही डॉ. राऊत यांनी नमूद केले.
मेश्राम यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त करत, त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.































