मुख्याध्यापिका अंबरीन फातिमा यांचा ‘आदर्श मुख्याध्यापिका’ पुरस्काराने सन्मान
श्री सुनील उत्तमराव साळवे
(9637661378 /9527190782)
मुख्य संपादक
Vansh News Digital Web portal online.
कामठी /नागपुर : 10 मार्च 2026
आज आपण ज्या मोकळ्या श्वासात आणि अधिकारात वावरत आहोत, त्याचं संपूर्ण श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जातं. अंगावर दगड-धोंडे आणि शेण सोसून त्यांनी ज्ञानाची जी कवाडं उघडली, त्यातूनच आजच्या डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील भगिनी घडल्या असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखाताई कुंभारे यांनी केले.
माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे ह्या हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेद्वारा संचालित हरदास विद्यालय आणि ड्रॅगन पॅलेस इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, सावित्रीबाई केवळ एक शिक्षिका नव्हत्या, तर त्या संघर्षाचं दुसरं नाव होत्या. आपल्या संस्थेचा उद्देश केवळ साक्षरता नसून, सावित्रीच्या लेकींना आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनवणे हाच आहे. अंबरीन फातिमा सारख्या समर्पित शिक्षिका जेव्हा या वारशाला पुढे नेतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होतं, असेही त्या म्हणाल्या.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आणि माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अंबरीन फातिमा यांचा झालेला विशेष सत्कार. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते त्यांना ‘सावित्रीबाई फुले स्मृती चिन्ह’ देऊन ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून गौरविण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक देवेंद्र जगताप सर दिलीप बोबडे सर प्रफुल वासे सर सुके सर, विनोद जुमडे सर, विशाखा पाटील मॅडम श्रीमती निशा कापसे मॅडम श्रीमती वैशाली अढाऊ मॅडम, सुकेशनी बागडे, चिमणकर सर, श्रीमती मेरी मारगेट, दिशा पिल्ले, रूपाली वंजारी, भूमिका डोंगरे, प्राची गजभिये, प्राची दोरसेटवर, पूजा सलगोटे इत्यादी शिक्षकगण प्रामुख्याने उपस्थित होते.
हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक औपचारिकता नसून स्त्री-शक्तीच्या सन्मानाचा आणि कर्तृत्वाचा जागर ठरला.


































